महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३१ मार्च । रेशन धान्य दुकानातून २०१४ पासून केरोसिन मिळणे बंद झाले. रॉकेलमुक्त देशातील अनुसूचित जातीसह अन्य विविध घटकांमधील सर्वसामान्य महिलांसाठी ‘उज्ज्वला’ योजना आणली. त्याअंतर्गत सध्या राज्यभरात ४६ लाख ८३ हजार २६१ लाभार्थी आहेत. दरमहा त्यांना एक गॅस सिलिंडर मिळतो. सुरुवातीला दीडशे ते तीनशे रुपयांपर्यंत मिळणारे अंशदान आता एक ते पाच रुपयांवर आले आहे. गॅस सिलिंडरचे दर वाढत असतानाही अंशदान मात्र कमी झाले. त्यामुळे जवळपास सव्वासात लाख ‘उज्ज्वला’ पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत आहेत.
हातावरील पोट असलेल्या महिलांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या चिंतेतून दररोज रोजगार शोधावा लागतो. चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांमध्ये डोळ्याचे विकार वाढले. त्यामुळे केंद्र सरकारने त्या महिलांना वर्षात १२ गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अंशदान अधिक मिळत असल्याने कनेक्शनची संख्या भरमसाठ वाढली. मात्र, अंशदान टप्प्याटप्याने कमी करण्यात आले. तीनशे रुपयांपर्यंत मिळणारे अंशदान मागील काही वर्षांत अवघ्या पाच रुपयांपर्यंत खाली आले. त्यामुळे पुन्हा सरपणाची ‘चूल’च बरी असा सूर त्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलांचा आहे.
‘उज्ज्वला’ योजनेची स्थिती
९५० ते १००० – गॅस सिलिंडरची किंमत
४६,८३,२६१ – एकूण लाभार्थी
१ ते ५ रुपये – उज्ज्वलाचे अंशदान
७.२५ लाख – अंदाजित कनेक्शन बंद