महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३१ मार्च । केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी बुधवारी त्यांच्या हायड्रोजनवर चालणाऱ्या टोयोटा ‘मिराई’ या कारमधून संसदेत पोहोचले. गडकरी पर्यायी इंधनाचे समर्थक आहेत आणि आता त्यांनी इंधनाचे भविष्य हायड्रोजन असल्याचे दाखवून दिले आहे. गडकरी म्हणाले, “आत्मनिर्भर होण्यासाठी आम्ही पाण्यापासून तयार होणारा ग्रीन हायड्रोजन आणला आहे. ही कार एक पायलट प्रोजेक्ट आहे. आता देशात ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन सुरू होईल. पेट्रोल-डिझेलच्या आयातीला आळा बसेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.” तथापि, देशात दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असतानाच गडकरींच्या या ग्रीन हायड्रोजन कारची देशभरात चर्चा सुरू झाली आहे.
म्हणूनच जाणून घेऊयात भविष्यातील या नव्या इंधनाबद्दल, ग्रीन हायड्रोजन काय आहे? यावर चालणारी कार किती मायलेज देते? भारत सरकारने या इंधनाच्या निर्मितीसाठी कोणती पावले उचलली आहेत? हे इंधन पेट्रोल-डिझेलला खरंच पर्याय ठरेल का?
टोयाटाची कार वापरत आहेत केंद्रीय मंत्री गडकरी
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी वापरत असलेल्या कारचे नाव मिराई आहे. ही जपानी कारनिर्माता कंपनी टोयोटाची कार आहे. ‘मिराई’ हा एक जपानी शब्द असून याचा अर्थ ‘भविष्य’ असा होतो. तसेही हायड्रोजन इंधन हे आता भविष्यातील इंधन मानले जात आहे. भारत पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत आयातीवर अवलंबून आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडींचा थेट परिणाम देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर आणि परिणामी महागाईवर होत असतो. ही इंधने महाग असण्याबरोबरच यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणही होते. याच्या उलट ग्रीन हायड्रोजन हा अतिशय स्वस्त वायू आहे. म्हणूनच या हायड्रोजन इंधनाचे उत्पादन आणि यावर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा उद्देश आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी म्हणाले की, भारत सरकारने 3000 कोटी रुपयांचे मिशन सुरू केले आहे आणि लवकरच आपण एक हायड्रोजन निर्यात करणारा देश बनणार आहोत. कोळशाचा जिथे वापर होतो, तिथे ग्रीन हायड्रोजनचा वापर केला जाईल. जानेवारी महिन्यात गडकरी म्हणाले होते की, ते हायड्रोजनवर चालणाऱ्या एका नवीन कारमध्ये दिल्लीच्या रस्त्यावर दिसणार आहेत. जेणेकरून लोकांना हायड्रोजन इंधन वापरण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकेल. हे भविष्यातील इंधन आहे. ही कार जपानच्या टोयोटा कंपनीची असून फरिदाबाद येथील इंडियन ऑईल पंपातून हायड्रोजन इंधन भरले जाणार असल्याचे गडकरींनी यापूर्वीच सांगितले होते.
पुढच्या दोन वर्षांत पेट्रोल कारच्या बरोबरीने होईल किंमत
संसदेत पर्यायी इंधनांबद्दल बोलताना गडकरी म्हणाले की, ग्रीन फ्यूएलमुळे इलेक्ट्रिक ऑटोमोबाइल्सची किंमत कमी होईल आणि पुढील दोन वर्षांत ते पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीने येतील. हरित इंधनाच्या वापरामुळे देशाच्या राजधानीतील प्रदूषण पातळीही कमी होईल.
गडकरी म्हणाले, “जास्तीत जास्त पुढील दोन वर्षांत इलेक्ट्रिक स्कूटर, कार, ऑटोरिक्षा यांच्या किमती पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर, कार, ऑटोरिक्षा यांच्याइतक्याच असतील. लिथियम आयन बॅटरीच्या किमती कमी होत आहेत. आम्ही झिंक आयन, अॅल्युमिनियम आयन, सोडियम आयन बॅटरीच्या या रसायनशास्त्राला विकसित करत आहोत. जर पेट्रोलवर तुम्ही 100 रुपये खर्च करत असाल, तर इलेक्ट्रिक वाहनासाठी तुमचे 10 रुपयेच खर्च होईल.”
अशी आहेत ग्रीन हायड्रोजन कारची वैशिष्ट्ये
नितीन गडकरी यांनी अलीकडेच या महिन्याच्या सुरुवातीलाच भारतातील पहिले हायड्रोजन आधारित अॅडव्हान्सड फ्यूएल सेल इलेक्ट्रिक वाहन टोयोटा मिराई लाँच केले. टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीने टोयोटा मिराई भारतीय रस्ते आणि हवामान परिस्थितीसाठी किती योग्य आहे याचा अभ्यास करण्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे.
ग्रीन हायड्रोजन कारमध्ये सुमारे साडेपाच किलो हायड्रोजन बसते.
ग्रीन हायड्रोजन हा पारंपरिक इंधनाचा पर्याय आहे जो कोणत्याही वाहनात वापरता येतो.
मध्यम ते लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ग्रीन हायड्रोजन इंधन अत्यंत विश्वासार्ह मानले जाते.
ग्रीन हायड्रोजन हे शून्य उत्सर्जन करणारे इंधन आहे. म्हणजेच त्यातून कोणतेही प्रदूषण होणार नाही.
प्रवासादरम्यान पाण्याशिवाय इतर कोणतेही उत्सर्जन होत नाही.
हायड्रोजनवर चालणाऱ्या कारमध्ये गॅस उच्च दाबाच्या टाकीत साठवला जातो. त्यानंतर ते वीज निर्मितीसाठी फ्यूएल सेलमध्ये पाठवले जाते. हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यातील अभिक्रियेमुळे वीज निर्माण होते आणि हे वाहन धावू लागते.
इलेक्ट्रिक वाहनांत इलेक्ट्रोलिसिस एनर्जीचा वापर केला जातो, परंतु हायड्रोजन वाहनात हीच टेक्नॉलॉजी रिव्हर्स वापरली जाते.
इलेक्ट्रिक वाहनांना जिथे चार्ज करण्यासाठी दोन-तीन तासांचा कालावधी लागतो, तिथे या हायड्रोजन आधारित वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेलप्रमाणेच अवघ्या 3 ते 5 मिनिटांत इंधन भरले जाऊ शकते.
एकदा पूर्ण टाकी भरल्यानंतर ही कार 646 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते.
या कारमध्ये ऊर्जेचा वापर होताना कोणतेही प्रदूषण होत नाही, उलट पाणी हे बायप्रोडक्ट आहे.
इलेक्ट्रिक वाहनांचा खर्च 1 रुपये प्रति किलोमीटर आहे. तर पेट्रोलवरील वाहनांचा खर्च कमाल 10 रु. प्रति किमी आहे. उलट ग्रीन हायड्रोजनचा प्रति किमी खर्च 2 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.