महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ एप्रिल । राज्यात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वाहनखरेदीत दीड पटीने वाढ झाल्याची माहिती आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या दोन दिवसांत राज्यातील सर्व आरटीओंमध्ये जुन्या व नव्या एकूण 15,109 वाहनांची नोंदणी झालेली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यात एकूण 9 हजार 529 वाहनांची नोंदणी झाली होती. त्यामुळे दोन दिवसांत एकूण 58% अधिक वाहनांची नोंदणी झाल्याचे दिसते.
याबाबत परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात झालेल्या एकूण वाहन नोंदणीत सर्वाधिक 11 हजार 429 वाहने ही पेट्रोलवर धावणारी आहेत. याशिवाय नोंदणी झालेल्या वाहनांत डिझेलवर धावणार्या 2 हजार 011, पेट्रोल-सीएनजीवर धावणारी 763, इलेक्ट्रिकवर धावणारी 491, सीएनजीवर धावणारी 195 आणि इतर वाहनांचा समावेश आहे. दरम्यान, वाहन नोंदणीशिवाय आरटीओमधून 1 हजार 617 परमिट वितरित करण्यात आले.
तसेच विविध प्रकारचे 35 हजार 527 व्यवहार झाल्याची नोंद आहे. या सर्व व्यवहारांमधून परिवहन विभागाने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल 78 कोटी 92 लाख 73 हजार 812 कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. यामध्ये 1 कोटी 31 लाख 90 हजार 565 रुपयांचे रोख, 76 कोटी 95 लाख 19 हजार 651 रुपयांचे डिजिटल आणि 65 लाख 63 हजार 596 रुपयांच्या इतर व्यवहारांचा समावेश आहे.