![]()
महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२० एप्रिल । महाराष्ट्रासह देशात कोळसाटंचाईचे संकट गडद होऊन वीजनिर्मिवर परिणाम होत असतानाच, राज्य व केंद्र सरकारकडून वेगवेगळी स्थिती मांडली जात आहे. याच पार्श्वभूमीवर एकीकडे राज्यातील महानिर्मिती कंपनीकडे फक्त सरासरी साडेतीन दिवसांचा कोळसा शिल्लक असल्याचे समोर आले आहे, तर दुसरीकडे केंद्राच्या कोल इंडियाकडून राज्यांना दिल्या जाणाऱ्या कोळशाच्या पुरवठ्यात १४.२ टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा केला जात आहे.
राज्य सरकारी महानिर्मिती कंपनीकडे फक्त सरासरी साडेतीन दिवसांचा कोळसा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. कोराडीतील चार संचांमध्ये मिळून २० हजार ९२१ लाख टन साठा आहे, तर संचनिहाय सर्वाधिक साठा चंद्रपूर औष्णिक केंद्रात आणि सर्वांत कमी भुसावळच्या प्रकल्पात आहे. कोळसाटंचाईमुळे महानिर्मितीच्या औष्णिक वीजप्रकल्पांतील उत्पादनावर परिणाम झाला आहे. कंपनीच्या प्रकल्पात क्षमतेपेक्षा किमान दोन हजार मेगावॉट कमी वीजनिर्मिती होत आहे.
ऊर्जा विभागाकडील माहितीनुसार, महानिर्मितीच्या आठ वीजनिर्मिती संचामध्ये मिळून मंगळवारी सकाळी सरासरी ३.५३ दिवस पुरेल इतका साठा आहे. सर्वाधिक ६.८८ दिवसांचा कोळसा साठा चंद्रपूरच्या प्रकल्पात आहे, तर भुसावळच्या प्रकल्पात सर्वांत कमी १.१३ दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे.
महानिर्मितीला एकूण स्थापित क्षमतेच्या ८५ टक्के वीजनिर्मितीसाठी एक लाख ३८ हजार ७१० लाख टन कोळशाची गरज आहे. त्या तुलनेत दोन लाख ३५ हजार ३१० लाख टन कोळसा कंपनीकडे आहे. पण त्यातील फक्त एक लाख २४ हजार ४९७ लाख टन कोळसा सध्या प्रकल्पांमध्ये आहे. त्यातही फक्त ३८ हजार ७९६ लाख टन कोळसाच वापरयोग्य आहे, तर एक लाख १० हजार ८१३ टन कोळसा विविध वॉशरीजमध्ये शुद्ध होण्यासाठी पडून आहे.
महानिर्मितीकडील वापरयोग्य कोळसा (लाख टनांत)
प्रकल्प क्षमता (मेगावॉट) साठा
कोराडी ३,०६० २०,९२१
नाशिक ४२० ०
भुसावळ १२१० ०
परळी ७५० ०
पारस ५०० ०
चंद्रपूर २,९२० ९,५००
खापरखेडा १,३४० ८,३७५