![]()
महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२० एप्रिल । राज्यातील विजेची मागणी आणि पुरवठय़ातील अडीच हजार मेगावॉटची तफावत भरून काढत गेल्या पाच दिवसांपासून राज्यातील भारनियमन बंद करण्यात ऊर्जा विभागाला यश आले आहे. मात्र, कोळसा टंचाईमुळे राज्यावरील वीजसंकट कायम असून, सुमारे आठ हजार मेगावॉट वाढीव विजेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी ऊर्जा विभागाला दिल़े.
कोळसा टंचाई आणि वाढत्या वीजमागणीमुळे राज्यात वीजसंकट निर्माण झाले आहे. राज्यातील विजेची रोजची मागणी आणि पुरवठा यात सुमारे दोन ते अडीच हजार मेगावॉट विजेची तफावत आहे. मात्र, सरकारने खुल्या बाजारातून वीज खरेदीस परवानगी दिल्यानंतर ऊर्जा विभागाने विविध उपाययोजनांच्या माध्यमातून ही तूट भरून काढल्याने गेल्या पाच दिवसांपासून राज्यातील भारनियमन बंद झाल़े मात्र, विजेच्या मागणीत दररोज वाढ होत असून, त्या तुलनेत कोळसा उपलब्ध होत नसल्याने सरकारची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्याची सध्याची वीजनिर्मिती, कोळशाचा साठा, विजेची सध्याची आणि भविष्यातील मागणी आणि याअनुषंगाने उपाययोजनांचा मंगळवारी आढावा घेतला. बैठकीस उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थाकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्यासह विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.