न्यायालयीन कोठडीतील 115 एसटी कर्मचाऱ्यांची जेलमधून सुटका होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ एप्रिल । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी सिल्वर ओकवर हल्ला झाला होता. काही सतंप्त एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक केली. याप्रकरणी १५५ जणांना पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, न्यायालयीन कोठडीत असलेल्या या 115 एसटी कामगार आज जेलमधून बाहेर येणार आहेत. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया आल्या. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. आज त्यांची पुन्हा एकदा मुंबईला रवानगी करण्यात आली आहे.

मागील आठवड्यात या 115 एसटी कर्मचाऱ्यांना मुंबई सेशन कोर्टकडून जामीन मंजूर झाला होता. यातील महिला भायखळा जेलमधून आणि इतर आरोपी आर्थररोड, तळोजा जेलमधून जामिनावर बाहेर येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आज दुपारनंतर एसटी कामगार कधीही बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावं, ही एसटी कर्मचाऱ्यांची मागणी राज्य सरकारने अमान्य केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी धडक दिली होती. यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली होती. आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र यावेळी एसटी कर्मचारी आणि पोलिस प्रशासनामध्ये संघर्षही झाला होता. यानंतर याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करु अशी माहिती गृह मंत्र्यांनी दिली होती. त्यानुसार ११५ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र आज ते सर्व जेलमधून बाहेर येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *