महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी। दि.३० एप्रिल । आठ लढतींतून सात विजय मिळवत टॉपवर असणारा गुजरात टायटन्स संघ उद्या मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवरील डे-नाइट आयपीएल लढतीत विजयासाठी धडपडणाऱया आणि पाचव्या स्थानावरील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाशी भिडणार आहे. गुजरात संघाची विजयी दौड रोखण्याचे मोठे आव्हान फॉर्मात येण्यासाठी संघर्ष करणाऱया बंगळुरू संघापुढे आहे. बंगळुरू संघात खेळणारे मोठे स्टार खेळाडू अद्याप आपला नैसर्गिक खेळ करू शकलेले नाहीत. त्यामुळे गुजरातसारख्या तुफानी फॉर्मात असणाऱया संघाला पराभूत करण्यासाठी त्यांना आपला खेळ उंचावावा लागणार आहे.
गुजरातने आतापर्यंतच्या आठ लढतींतील सात लढती जिंकून आपला झेंडा उंच फडकवत ठेवला आहे. त्याचे कारण त्यांच्या संघात अनेक मॅचविनर खेळाडू तयार आहेत. बंगळुरूला मात्र कर्णधार फाफ डुप्लेसिस वगळता अन्य मॅचविनर खेळाडूचा शोध घ्यावा लागणार आहे.