उष्णतेच्या लाटांमुळे राज्यात दोन महिन्यांत उष्माघाताचे २५ बळी ; नागपुरातील प्रमाण ४४ टक्के

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.२ मे। एकामागोमाग एक येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे यंदा मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यात २५ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला, तर ३७४ जणांना उष्माघाताची बाधा झाली. मृतांची ही संख्या गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे ४४ टक्के मृत्यू नागपूरमध्ये झाले आहेत.

यावर्षी एप्रिलमध्ये तिसऱ्यांदा उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात अकोला, ब्रह्मपुरी आदी भागांमध्ये तर तापमान ४५ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले आहे. परिणामी विदर्भात उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा तीव्र असल्यामुळे उष्माघाताची बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.

एप्रिल महिन्यात राज्यभरात २५ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला असून यात सर्वाधिक ११ मृत्यू नागपूरमध्ये झाले आहेत, तर याखालोखाल जळगावमध्ये चार, अकोल्यात तीन, जालन्यात दोन आणि अमरावती, औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद आणि परभणी येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे प्रमाणही वाढले असून दोन महिन्यांत ३७४ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यात सर्वाधिक २९५ रुग्ण नागपूर विभागातील, तर ३२ जण अकोला विभागातील आहेत. विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचीही उष्णतेने होरपळ होत असून बहुतांश ठिकाणी तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. त्यामुळे या विभागांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. नाशिक विभागात १४, औरंगाबादमध्ये ११ तर लातूर विभागामध्येही एका रुग्णाला उष्माघाताचा त्रास झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही कमाल तापमान ४१ ते ४३ अंश सेल्सियसपर्यंत आहे. पुणे विभागात २० रुग्णांना, तर कोल्हापूर विभागात एका रुग्णाला उष्माघाताचा त्रास झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *