महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.२ मे। राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिला. महाराष्ट्र दिनानिमित्त जालना येथे टोपे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झाले. त्याप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी मास्कचा वापर केला पाहिजे असे आवाहनही आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी केले.
‘राज्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आठव्या क्रमांकावर आहे. सध्यातरी चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही. चांगल्या पध्दतीने झालेल्या लसीकरणाचा हा परिणाम आहे. सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार असून पेंद्र सरकारकडून तशा सूचना आल्यानंतर त्याप्रमाणे त्याचे नियोजन केले जाईल.’ असे आरोग्यमंत्री टोपे याप्रसंगी म्हणाले.
देशात गेल्या 24 तासांत 3324 नवे कोरोना रुग्ण आढळले तर 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 1520 रुग्ण दिल्लीमधील आहेत. सध्या दिल्लीत 5716 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 19092 झाली आहे. देशात कोरोना संसर्गाचे सर्वाधिक प्रमाण दिल्लीमध्ये आहे. महाराष्ट्रात 155 नवे रुग्ण आढळल्यानंतर उपचाराखालील कोरोना रुग्णसंख्या 998 झाली आहे. सर्वाधिक रुग्णांची नोंद मुंबईत झाली आहे.