महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.७ मे । समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनामार्फत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या तीन लाख २० हजार ९६२ विद्यार्थ्यांना १५ लाख ६७ हजार ४९० मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १३ जून रोजी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन जिल्हा परीषद शिक्षण विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील तीन लाख २० हजार ९६२ विद्यार्थ्यांना १५ लाख ६७ हजार ४९० मोफत पाठ्यपुस्तके मिळावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बालभारतीकडे केली आहे. बालभारतीकडून ३० मे अखेर त्या-त्या तालुक्यांना पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकाऱ्याकडून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोचविण्यात येणार आहेत.
खासगी शाळांशी स्पर्धा करताना पटसंख्या टिकविण्याचे आव्हान असतानाही जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९८ शाळांमधील सहावी ते आठवीतील जवळपास २८ हजार विद्यार्थ्यांसाठी केवळ २५ ते २७ विज्ञानाचे शिक्षक असल्याची धक्कादायक माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मागील काही वर्षांपासून अशीच आवस्था असतानाही वरिष्ठांनी त्याची दखल घेऊन निर्णय घेतला नाही हे विशेष.
शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, अनुदानास पात्र झालेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि त्यांच्या अनुदानित तुकड्यांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते.