फळांचा राजा महागच; आमरसाचा गोडवा कमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ मे । अक्षयतृतीयेला आंब्याला मागणी वाढते. त्यामुळे अक्षयतृतीयेपासून बाजारपेठेत आंब्याची आवक वाढली आहे. तरीदेखील दर मात्र चढेच असल्याने फळांचा राजा आंबा खरेदी अद्यापही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. अवकाळीमुळे उत्पादन घटल्याने दरवाढ कायम आहे. त्यामुळे हंगामी आमरसालाही महागाईच्या झळा बसत आहेत.

फळांचा राजा म्हणून आंब्याला मान मिळाला आहे. त्याची गोडी, उपयुक्ता आणि उपलब्धताही त्यासाठी कारणीभूत आहे. भौगोलिकता व वातावरणानुसार पाडव्याला पाड अन् आखितीला गोड ही उक्ती ऐकत लहानाचे मोठे झालेल्या नागरिकांना यंदा मात्र आंबा अद्याप आंबट आहे. वातावरणातील बदलांमुळे सर्वच हंगाम पुढे गेला आहे. अवकाळीमुळे आंब्याचा आगाप मोहर झडून गेल्याने फळधारणाही कमी झाली आहे. त्याचा परिणाम आंब्याच्या दरावर झाला आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या नैवेद्यामध्ये आंबा व आमरसाला विशेष स्थान असते. अनेक देवदेवतांच्या मंदिरांमध्ये आंब्याची आरास केली जाते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आंब्याची आवक वाढते. त्यामुळे दरही सर्वसामान्यांना परवडणारे असतात. याही वर्षी आखितीसाठी सातारा शहरातील बाजारपेठेत देवगड व रत्नागिरी हापूस, कर्नाटक हापूस, पायरी, गुजरात हापूस आदि वाणांची मोठ्या प्रमाणावर आंब्याची आवक झाली होती. आता उन्हाळा वाढू लागल्याने आंब्याची आवक वाढतच राहणार आहे. परिणामी दर उतरणे अपेक्षित होते. मात्र अद्याप आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरच आहेत. महागाईचा भडका उडाला असून त्याचा फटका हंगामी फळांना बसत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अतिउष्म्याने नागरिकांना अशक्तपणा थकवा जाणवतो. आंब्यातील मुबलक ग्लुकोज हा थकवा दूर करते. शरीराला ताकद देते. त्यामुळे उन्हाळ्यात आमरसपुरीचा बेत खासकरुन आखला जातो. परंतू जीवनावश्यक वस्तू व खाद्यतेलाबरोबरच आंब्याचेही दर अद्याप कमी झालेलेे नाहीत. त्यामुळे यावर्षी हंगामी आमरसालाही महागाईच्या झळा बसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *