नवी मुंबई घाऊक भाजीपाला-फळबाजार उद्यापासून बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र्र २४ – ऑनलाईन -मुंबई : नवी मुंबई येथील बाजार समितीमध्ये एक घाऊक व्यापारी करोनाबाधित आढळल्याने येथील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून बाजारात व्यापार होत असला, तरी सामूहिक संपर्कातून प्रसाराची भीती भेडसावत आहे. त्यामुळे फळे, भाजीपाला आणि कांदा-बटाटा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यापार न करण्याचा निर्णय घेतला आहे.बाजार समितीनेही व्यापाऱ्यांच्या निर्णयापुढे हात टेकत उद्या, ११ एप्रिलपासून हे तिन्ही बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बाजार बंद राहिले, तरी शहरभर थेट केला जाणारा शेतमालाचा पुरवठा मात्र सुरू राहील, असे बाजार समितीने स्पष्ट केले आहे.

करोनामुळे २२ मार्चला लावलेल्या लॉकडाऊनपासून बाजार समितीत गर्दी होत असल्याने तिन्ही बाजारातील व्यापाऱ्यांनी बाजार बंद करण्याची भूमिका घेतली होती. मात्र जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा थांबला, तर घबराट पसरून परिस्थिती चिघळण्याची शक्यता होती. त्यामुळे बाजार समिती प्रशासन तसेच पणन संचालकांनी व्यापाऱ्यांची मनधरणी करून बाजार सुरू करण्यात यश मिळवले. तरीही बाजारातील गर्दीचा प्रश्न होता. त्यावर उपाय योजून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

अन्नधान्य, मसाला बाजार सुरूच

अन्नधान्य आणि मसाला बाजारात मात्र गर्दीची परिस्थिती नाही. त्यामुळे ते बाजार बंद ठेवण्याची गरज नाही. बाजार समितीचे या दोन्ही बाजारांवर नियंत्रण असून येणाऱ्या व जाणाऱ्या मालाची नोंद करणे गरजेचे आहे. बाजार सुरू राहणार असल्याने अन्नधान्याचा पुरवठा मुंबई उपनगरात अबाधित राहील, असे बाजार समिती प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *