महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई – कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. याची मुदत ही 14 एप्रिलपर्यंत देण्यात आली आहे. मात्र झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा पाहिल्यानंतर हा कालावधी वाढवण्यात यावा अशी मागणी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच केली आहे. हा कालावधी वाढवायचा अथवा नाही याबाबतचा निर्णय अजून झालेला नाहीये. शनिवारी म्हणजेच 11 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हि़डीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये ते सर्व मुख्यमंत्र्यांकडून कालावधी वाढवण्याबाबत त्यांचे मते जाणून घेणार आहेत. या बैठकीनंतर हा कालावधी वाढवण्याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांनी देशात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन घोषित केला होता, जो 14 एप्रिल रोजी संपतो आहे. तो वाढवायचा असल्यास पंतप्रधान स्वत: एक निवेदन देशाला उद्देशून करतील ज्यात ते याबाबतचा निर्णय जाहीर करतील. ओडिशा आणि पंजाब या सारख्या राज्यांनी त्यांच्या राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. ओडिशामध्ये लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे तर पंजाबमध्ये ही मुदत 1 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.