महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नवी दिल्ली : करोना व्हायरसचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात करोनाबाधितांची संख्या १० हजाराच्या पुढे गेली आहे. तसेच मृतांची संख्या ३३९ वर पोहोचली आहे.आतापर्यंत देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १०, ३६३ वर पोहोचली आहे. या बरोबरच आता पर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार ०३५ इतकी असून ३३९ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले असतानाच लॉकडाऊनच्या दुसर्या टप्प्यात मात्र अनेक निर्बंध शिथिल होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. कोरोना रोखला जाईल आणि अर्थव्यवस्थेची थांबलेली चक्रेही पुन्हा सुरू होतील, असे मध्यममार्गी निर्बंध हटवले जाऊ शकतात. मात्र मुंबई, दिल्ली, पुणे यासारख्या कोरोना हॉटस्पॉट शहरांना कोणतीही सूट लॉकडाऊन-2 मध्ये देखील मिळण्याची सुतराम शक्यता नाही.