महाराष्ट्र २४ – ऑनलाईन -वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. कोरोना व्हायरससंदर्भात जागतिक आरोग्य संघटना(WHO) आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची चीननं वारंवार फसवणूक केली आहे. चीननं या व्हायरससंदर्भात चुकीची माहिती दिल्यानंतर त्याचे पूर्ण जगाला दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. चीनच्या वुहान शहरातूनच या व्हायरसचा जगभरात प्रसार झाला आहे, याबाबत कोणतीही शंका नसल्याचंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.
व्हाइट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं डोनाल्ड ट्रम्प यांना चीनसंदर्भात काही प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना त्यांनी चीनला थेट धमकीच देऊन टाकली आहे. चीनविरोधात आम्ही काय कारवाई करणार आहोत, हे येत्या काळात तुम्हाला समजेलच, परंतु ते आता उघडपणे सांगू शकत नाही, पण त्यांनी आता परिणाम भोगायला तयार राहावं, असंही पत्रकाराला उद्देशून डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.