महाराष्ट्र २४ – ऑनलाईन -पुणे. पुणे परिसरात २८० पेक्षा अधिक काेराेना रुग्ण झाले असून राज्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील ससून रुग्णालय येथे ७०० बेडची नवीन ११ मजली स्वतंत्र इमारत काेराेना रुग्णालय म्हणून साेमवारपासून कार्यान्वित झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिशय वेगाने ही इमारत पूर्ण केली आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना संशयित व बाधित रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने ससूनच्या नवीन इमारतीचे काम तत्काळ पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली. पहिल्या टप्प्यात ७०० पैकी ४७८ बेडची व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयात अवघ्या ३६ तासांत नवीन उच्च दाब वीज जोडणी देण्यात आली. महावितरणकडून नवी वीज यंत्रणा उभारण्याच्या सर्व कामांची जबाबदारी घेत या इमारतीसाठी ६०४ केडब्ल्यू वीजभाराची नवीन उच्च दाब वीज जोडणी करण्यात आली .
अत्यावश्यक सेवा
ससून रुग्णालयात ४० व्हेंटिलेटरसह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती ससूनचे अधिष्ठाता डाॅ. अजय चंदनवाले यांनी दिली. यामुळे रुग्णांची मोठी सोय होणार आहे.
इमारतीमध्ये १३ हजार लिटर ऑक्सिजन व्यवस्था
१३ हजार लिटर ऑक्सिजन व्यवस्था या ठिकाणी बसवण्यात आली आहे. ५० आयसीयू आणि ११ मजल्यावर वातानुकूलित ३०० टनांची व्यवस्था पाच दिवसांत कार्यरत करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी चांगले हाॅस्पिटल उभे राहिले असून त्याचा फायदा सर्वांना हाेईल.
१५ दिवसांत पूर्ण
११ मजली इमारत
७०० खाटा
३६ तासांत उच्च दाब वीज जोडणी
४० व्हेंटिलेटरसह अत्यावश्यक सुविधा
१३ हजार लिटर ऑक्सिजन व्यवस्था