महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । Maharashtra Political Crisis :शिवसेनेत बंड केलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ वाढत असतानाच आता भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 2019 मध्ये स्थापन केलेल्या 80 तासांच्या सरकारमध्ये अजित पवारांना असलेली ऑफरच शिंदेंना भाजपने दिल्याची माहिती समोर येत आहे.
उपमुख्यमंत्रीपदासह 12 मंत्रिपदं शिंदे गटाला मिळतील अशी शक्यता आहे. शिंदे गटाला मंत्रिमंडळाच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के खाती मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंसह 10 जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातल्या 6 मंत्र्यांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे. त्या सहाही मंत्र्यांना नवा सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटात आणखी चार आमदार सामील झाले आहेत. शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह योगेश कदम, चंद्रकांत पाटील, मंजुळा गावित हे चार आमदार गुवाहाटीत दाखल झाले आहेत. हे चारही आमदार हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये दाखल झाले.