राजकीय घडामोडींना वेग ; सत्ता स्थापनेत सागर बंगला ठरणार महत्वाचा केंद्रबिंदू ? तर सिल्वर ओकवरही बैठकींचं सत्र

 158 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । एकीकडे महाविकास आघाडी सरकार अखेरच्या घटका मोजत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या गोटात सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर निवासस्थानी कालप्रमाणे आजही फडणवीस यांच्या भेटीसाठी नेत्यांची रिघ लागली आहे. भाजपा आमदार, खासदार, नेते भेटीस तर येतच आहेत. याशिवाय अपक्ष आमदारही देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या शासकीय बंगल्यावर दाखल होत आहेत.

आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर, जयकुमार रावल, आशिष शेलार, नितेश राणे, गिरीश महाजन, मंगेश चव्हाण खासदार धनंजय महाडिक, सुभाष भामरे, श्रीकांत भारतीय हे सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत. याशिवाय अपक्ष आमदार प्रकाश आवडे यांचे पुत्र राहुल आवडेदेखील फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत.

भाजपाच्या गोटात मोठी खलबत सुरू आहेत. मात्र जोपर्यंत एकनाथ शिंदे हे आपली पुढची भुमिका किंवा रणनीती स्पष्ट करत नाहीत. तोपर्यंत भाजपा आपले पत्ते किंवा रणनीती स्पष्ट करणार नाही अशी भूमिका सध्या भाजपने घेतली आहे. यासंदर्भात एकाही भाजपा नेत्याला मीडियाशी न बोलण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत.

एकीकडे वर्षावर आणि सिल्व्हर ओकवर अखेरपर्यंत सरकार वाचवण्यासाठी बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. तर दुसरीकडे सागर बंगल्यावर एकनाथ शिंदे गटाला बरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी रणनीती आखली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *