84 total views
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे-सासवड-लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती इंदापूर अकलूज मार्गे पंढरपूरला जाते. या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी या मार्गावरील वाहतूकीत बदल आवश्यक असल्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी 24 ते 28 जून या कालावधीत तर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी २४ जून ते ५ जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. तसेच या कालावधीसाठी वाहतूक नियमनाचे आदेश त्यांनी जारी केले आहेत.