जागतिक आरोग्य संघटनेला डोनाल्ड ट्रम्प ह्यांचा झटका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – , मुंबई :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोनाच्या धोक्याची वेळेवर माहिती दिली नाही. तसेच आवश्यक पावले उचलण्यापासूनही रोखले. उलट, संघटना चीनचे कौतुक करत राहिली, असा गंभीर आरोप करत डब्ल्यूएचओला दिला जाणारा निधी थांबवला आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

डब्ल्यूएचओला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी मिळत होता. त्यामुळे या निर्णयाचे दूरगामी परिणाम होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपले कर्तव्य निभावले नाही, असा ठपका ठेवत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संघटनेला अमेरिकेच्या वतीने दिली जाणारी मदत थांबविण्याचे आदेश दिले. यामुळे जागतिक स्तरावर एक नवा पेच उभा राहिला असून अमेरिकन प्रशासन निर्माण होणार्‍या परिस्थितीचा आढावा घेते आहे.

दरम्यान, ट्रम्प यांच्या या निर्णयावर अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिस हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्षांचे हे पाऊल चुकीच्या दिशेने असल्याचे सांगत कोरोनाविरुद्धची लढाई यामुळे सोपी होणार नसल्याने या निर्णयाचा त्यांनी पुनर्विचार करावा, अशी विनंती केली आहे. अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला प्रतिवर्षी मोठी मदत करते. 2019 मध्ये अमेरिकेने या संस्थेला 400 मिलियन डॉलर्सचे (सुमारे 3000 कोटी रुपये) अर्थसाहाय्य केले होते. हे अर्थसाहाय्य या संस्थेच्या वार्षिक अंदाजपत्रकाच्या 15 टक्के इतके आहे.

जागतिक महामारीच्या भयावहतेची योग्य वेळी कल्पना दिली नाही. प्राथमिक अवस्थेतच चीनमधील प्रवासाला बंदी घातली असती तर जगभरातील अनेक लोकांचे प्राण वाचू शकले असते. केवळ या संघटनेने योग्य न दिशा दिल्यामुळे लाखो अमेरिकन नागरिकांना आपले रोजगार गमवावे लागले. नागरिक घरी बसून राहिले, उद्योगधंदे बंद करावे लागले. यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थाही संकटात सापडली आहे, असे ट्रम्प म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *