‘हा निर्णय अचानक घेण्यात आला नव्हता ; फडणवीस यांच्या नेतृत्वाला ब्रेक लावण्याचे काम ? ; पृथ्वीराज चव्हाण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ जुलै । भाजपमधील देवेंद्र फडणवीस यांच्या अतिउत्साही समर्थकांमुळेच त्यांना तोटा सहन करावा लागला, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. भाजप कार्यकर्त्यांच्या तयार झालेल्या प्रतिमेमुळेच उदयोन्मुख नेते फडणवीस यांच्या नेतृत्वाला ब्रेक लावण्याचे काम राष्ट्रीय पातळीवरून करण्यात आल्याची शक्यता त्यांनी बोलून दाखविली.

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्रिपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेण्याचे आदेश थेट दिल्लीवरून देण्यात आले. दिल्लीतील या आदेशानंतर याबाबत अनेक तर्कवितर्क वर्तविले जात असतानाच, ‘हा निर्णय अचानक घेण्यात आला नव्हता. तो जाणीवपूर्वक घेतला गेला’, असे विश्लेषण काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ते पुढे म्हणाले, ‘राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला चांगले यश मिळत आहे. शिवसेनेचे वाढते वजन लक्षात घेता भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची धुरा दिली असावी. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देणे आणि शिवसेनेचे वजन कमी करणे हेदेखील कारण असावे.’ तसेच मराठा समाज डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला गेल्याची शक्यताही चव्हाण यांनी बोलून दाखविली. लवकरच खाते वाटपादरम्यान एकनाथ शिंदे यांना नाराजीचा सामना करावा लागणार असल्याचे सांगत चव्हाण यांनी त्यांना सबुरीचा सल्लाही दिला.

एकत्र लढण्याचा सल्ला

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही दिवसांपूर्वीच ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत आगामी निवडणुकीत एकत्र जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. तर, पुढील भूमिका ठरविण्यासाठी लवकरच एकत्रितपणे निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितल्याचे चव्हाण म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *