एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर गट आक्रमक ; निर्णयालाच दिलं आव्हान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । ‘तुम्ही पक्षविरोधी कारवायांत गुंतल्याचे स्पष्ट झालं असून, तुम्ही पक्षाचे सदस्यत्वही स्वतःहून सोडलं आहे. त्यामुळे पक्षप्रमुख या नात्याने मी तुम्हाला पक्षनेतेपदावरून दूर करत आहे,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची नेतेपदावरून हकालपट्टी केली. या कारवाईनंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांचा गट आक्रमक झाला असून या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव यांच्या निर्णयालाच आव्हान दिलं आहे.

‘शिवसेना नेतेपदावरून एकनाथ शिंदे यांना काढल्याचं पत्र काल आम्हाला देण्यात आलं आहे. याबाबत आम्ही उत्तर देऊ. हे उत्तर दिल्यानंतरही कारवाई मागे घेण्यात आली नाही तर आम्ही कायदेशीर लढाई लढू,’ असा इशारा दीपक केसरकर यांनी शिवसेना नेतृत्वाला दिला आहे. तसंच मुख्यमंत्री झाल्याने एकनाथ शिंदे हे आता सभागृहाचे नेते झाले आहेत. शिंदे यांना गटनेतेपदावरूनही काढण्यात आल्यानंतर आम्ही त्याला चॅलेंज केलं होतं, असंही केसरकर म्हणाले.

‘उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली तरी प्रत्युत्तर द्यायचं नाही, असं आम्ही ठरवलं आहे. आमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, मात्र उद्धव ठाकरे हे आमचे नेते असल्याने उत्तर न देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. बहुमत सिद्ध करताना आम्ही विजयी झाल्यानंतर कोणताही जल्लोष करणार नाही. जेव्हा महाराष्ट्राचा विकास होईल, तेव्हाच आम्ही जल्लोष करू,’ अशी भूमिका दीपक केसरकर यांनी मांडली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात सामील झाल्याने संपूर्ण राज्यालाच मदत होणार आहे. फडणवीस यांच्याकडे असलेली माहिती, त्यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेले प्रकल्प आता वेगात पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती केसरकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *