महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपने मिळून नवीन सरकार स्थापन केलं आहे. यानंतर नव्या सरकारने सगळ्यात पहिला धक्का शिवसेनेला दिला होता. राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3 (Metro 3) चे कारशेड आरे कॉलनीमध्येच (Aarey colony) होणार असल्याचं जाहीर केलं होतं. अशात आता एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) दणका दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावला आहे. घाईघाईत कामांना मंजुरी कशासाठी ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी सवाल केला आहे. कार्यसमितीची बैठक घेऊन घाईघाईने 567 कोटींचं काम मंजूर करण्यात आलं होतं. या कामाला ब्रेक लावत एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ यांना मोठा धक्का दिला आहे.
याआधी नवीन शिंदे सरकराने शिवसेनेला मोठा धक्का दिला होता. यापूर्वीच्या उद्धव ठाकरे सरकारनं आरे कॉलनींमध्ये होणारा हा प्रकल्प रद्द केला होता. त्यानंतर शिंदे सरकारनं पहिल्याच बैठकीत ठाकरे सरकारचा निर्णय फिरवत पुन्हा एकदा मेट्रो 3 चे कारशेड हे आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्य सरकारनं अॅडव्होकेट जनरलला या प्रकरणात कोर्टात बाजू मांडण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीलाही धक्का देत जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावला आहे.