महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे. पण एकनाथ शिंदे यांच्यापुढील अडचणी काही कमी झाल्या नाहीत. अशातच विधानसभा अध्यक्षपदाची (Vidhan Sabha Speaker) निवडणूकही जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना व्हीप बजावणार आहे. एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदारांना बजावणार व्हीप लागू असेल, अशी माहिती शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला आहे. आता सोमवारी शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या वतीने राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी विधानभवनामध्ये आमदार सचिन अहिर यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली.
‘शिवसेनेतून आमदारांनी बंडखोरी केली आहे. आमदार सोडून गेले असले तरी पक्षसंघटना अधिक मजबूत करणार आहोत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आक्रमक भूमिका मांडणार, संघटन अधिक जोमानं उभं करणार, असं अहिर यांनी सांगितलं.
‘विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. मुळात आधीच हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे. तरीही शिंदे सरकारने अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा घाट घातला आहे. पण आम्हीही आमचा उमेदवार उतरवला आहे. सर्व आमदारांना पक्षप्रतोद व्हीप बजावणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांना हा व्हीप लागू असणार आहे. कायदेशीर लढाई कोर्टात सुरूच राहणार आहे, असं अहिर यांनी स्पष्ट केलं.