महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवसात इंग्लंड (ENG) संघाने आपली पकड मजबूत केलीय. 378 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडनं तीन गड्यांच्या मोबदल्यात 259 धावा केल्या. इंग्लंड संघाला पाचव्या दिवशी 119 धावा करायच्या आहेत. त्याचवेळी भारताला (IND) सात विकेट्सची गरज आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जो रूट आणि जॉनी बेअरस्टो चांगली फलंदाजी करत आहेत. आतापर्यंत दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी झाली आहे. बेअरस्टो 72 आणि रूट 76 धावांवर नाबाद परतले. भारताकडून कर्णधार जसप्रीत बुमराहनं (Jaspirt Bumrah) दुसऱ्या डावात दोन बळी घेतले. त्याने जॅक क्रोली (46) आणि ऑली पोप (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्याचवेळी अॅलेक्स लीस धावबाद झाला. इंग्लंडविरुद्धच्या या पाचव्या कसोटीत भारतानं पहिल्या डावात 416 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 284 धावांवर गारद झाला आणि भारताला 132 धावांची आघाडी मिळाली. भारतानं दुसऱ्या डावात 245 धावा केल्या. अशाप्रकारे इंग्लंडला 378 धावांचे लक्ष्य मिळालं.
दुसऱ्या डावात भारतानं सोमवारी तीन बाद 125 धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि 120 धावांची भर घालून संघ सर्वबाद झाला. पुजारा 66 धावा करून बाद झाला. त्याचवेळी पंतने 57 धावांची खेळी खेळली. पंतनं कसोटी कारकिर्दीतील 10वं अर्धशतक झळकावलं. श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांना फार काही करता आलं नाही. दुसऱ्या डावात
शुभमन गिल चार धावा, हनुमा विहारी 11 धावा, विराट कोहली 20 धावा, श्रेयस अय्यर 19 धावा, रवींद्र जडेजा 23 धावा, शार्दुल ठाकूर 4 धावा, मोहम्मद शमी 13 धावा आणि कर्णधार जसप्रीत बुमराह 13 धावा सात धावा करून बाद झाला. मोहम्मद सिराज दोन धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सनं सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याचवेळी स्टुअर्ट ब्रॉड आणि मॅटी पॉट्सनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जेम्स अँडरसन आणि जॅक लीच यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
378 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली. संघानं 21 षटकांत 100 धावा केल्या होत्या. जॅक क्रॉली आणि अॅलेक्स लीस यांनी पहिल्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. लीसनं कसोटी कारकिर्दीतील दुसरं अर्धशतक झळकावलं. सामना 22 व्या षटकात फिरला आणि जसप्रीत बुमराहनं क्रॉलीला क्लीन बोल्ड केलं. क्राऊली 46 धावा करून बाद झाला.
त्यानंतर टी-ब्रेक आला. टी ब्रेकमधून परतल्यावर बुमराहनं पहिल्याच चेंडूवर ऑली पोपला यष्टिरक्षक पंतकरवी झेलबाद केलं. पोप यांना खातेही उघडता आलं नाही. यानंतर पुढच्याच षटकात अॅलेक्स लीस धावबाद झाला. तो 65 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. तीन विकेट पडल्यानंतर रुट आणि बेअरस्टो यांनी जबरदस्त फलंदाजी करत एकही विकेट पडू दिली नाही. आजचा (मंगळवार) दिवस भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे.