महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असले तरीही त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागत नाही, हा मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या दरम्यान कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन, वैद्यकीय तज्ज्ञांनी दिले.
पुण्यात गेल्या सात आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पण, त्याच वेळी पावसाळी वातावरणामुळे शहरात पुन्हा ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. त्यामुळे पुणेकरांनी वैयक्तिक आरोग्य सुदृढ राहाण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहनही डॉक्टरांनी केले.
शहरात कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यांची कोरोना टेस्ट ‘निगेटिव्ह’ येत आहे. पण, त्यानंतरही मास्कचा वापर करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे गर्दीत जाणे टाळावे. तसेच, ताप आल्यास वेळ न घालवता वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही स्पष्ट केले.