कोल्हापूरसाठी हाय अलर्ट ; पंचगंगा उद्या इशारा पातळी गाठणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. ८ जुलैपर्यंत अशाच पद्धतीने जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे पाणी पातळीत होत असलेली वाढ पाहता उद्या दुपारपर्यंत पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सद्यस्थितीत २७ फुटांवर पाणी पातळी पोहोचली असून ३९ फूट इतकी इशारा पातळी आहे. इशारा पातळी गाठण्यासाठी केवळ १२ फूट पाणी पातळी कमी असल्याने यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून इशारा मिळताच नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पूरसंभाव्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, पोलीस उपअधीक्षक तिरुपती काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ पशु उपायुक्त आरोग्य अधिकारी यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आपत्तीजनक काळात कोणत्याही पद्धतीने अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या गावातील संबंधित ग्रामसेवक तसेच तलाठी यांच्या संपर्कात राहून त्यांना अधिकृत माहिती विचारा. या शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत तात्काळ अधिकृत माहिती पोहोचवली जात असल्याची माहिती सुद्धा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

याशिवाय पब्लिक अड्रेस सिस्टीमद्वारे आपण जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सूचना देत आहोत. नदीकाठच्या नागरिकांना सुद्धा वारंवार सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे त्यांनी सुद्धा इशारा पातळी ओलांडल्याचा इशारा मिळताच आपापली गावं सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

दरम्यान, गगनबावडा तालुक्यात काल सकाळपासून सर्वाधिक २५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर राधानगरी तालुक्यात १५० मिलिमीटर तर शाहूवाडी तालुक्यात सुद्धा १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पन्हाळा, करवीर तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून सर्वात कमी शिरोळ तालुक्यात पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *