लालू प्रसाद यादवांची तब्येत बिघडली ; एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीला हलवणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । बिहारची राजधानी पाटणा येथील पारस रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली आहे. तब्येत बिघडत चालल्याने त्यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीला नेण्याची तयारी सुरू आहे. आज सायंकाळी त्यांना दिल्लीला हलवण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही चर्चा केली आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पारस रुग्णालयामध्ये जाऊन लालू प्रसाद यादव यांची भेट घेत तब्येतीची चौकशी केली.

चारा घोटाळा प्रकरणी दोषी ठरलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. सध्या ते माजी मुख्यमंत्री आणि पत्नी राबडी देवी यांच्या शासकीय निवासस्थानी आहेत. रविवारी लालू प्रसाद दुमजली निवासस्थानाच्या पायऱ्यांवरून खाली उतरत होते. यादरम्यान तोल गेल्याने त्याचा पाय घसरला, त्यामुळे ते पडले. घटनेनंतर लगेचच नातेवाईकांनी त्यांना पाटणा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

प्राथमिक तपासात त्याच्या खांद्याला आणि कमरेला गंभीर दुखापत झाल्याचे बोलले जात आहे. तसेच आधीपासूनच त्यांना काही आजार असून फुफ्फुसामध्ये पाणी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांनी पुढील उपचारांसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. या संदर्भामध्ये तेजस्वी यादव यांनी पारस रुग्णालयाबाहेरून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आवश्यकता भासल्यास लालू प्रसाद यादव यांना सिंगापूरला नेण्यात येईल, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले. अशा संकटसमयी सर्व राजकीय पक्ष एकजूट असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी फोनवरून राजद प्रमुखांच्या तब्येतीची चौकशी केल्याचेही तेजस्वी यादव यांनी सांगितले.

भावूक आवाहन

लोकांनी आपल्या घरात लालू प्रसाद यादव यांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करावी, असे भावूक आवाहन तेजस्वी यादव यांनी बिहारच्या नागरिकांना केले आहे. दुसऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास होईल त्यामुळे नागरिकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *