‘माझ्या मध्यस्थी मुळे एकनाथ शिंदे आमदार झाले , आज पश्चाताप होतोय’: खासदार विनायक राऊत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत 40 आमदारांसह भाजपसोबत (BJP) हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवसेना आणि त्यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटच्या माध्यमातून “रिक्षाच्या स्पीड पेक्षा मर्सिडीजचा स्पीड फिका पडला” असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला. यावर बोलताना शिवसेना खासदार विनायक राऊत (Shivsena MP Vinayak Raut) म्हणाले की, माझ्यामुळे एकनाथ शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली याचा मला पश्चाताप होत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून देतं म्हणून ट्वीट करायचं. स्वत:च्या हाताने ट्वीट करता येतं का? याचा शोध घ्यावा लागेल. एकनाथ शिंदे यांना माझ्या मध्यस्थिमुळे विधानसभेची उमेदवारी मिळाली त्याचा पश्चाताप होतो आहे. आयुष्यातील मोठं पाप झालंय. मी सांगितलं नसत तर एकनाथ शिंदेना आमदारकी मिळाली नसती, असं विनायक राऊत म्हणाले.

शिवसेनेचे 40 आमदार शिंदे गटात सामिल झाले आता खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 18 पैकी 12 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत तर 22 माजी आमदार देखील संपर्कात असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच म्हटलंय की, मी तुमच्या कोणावर जबरदस्ती करणार नाही. जे मनापासून माझ्याबरोबर आहेत त्यांनी माझ्यासोबत राहा तुमचं दुसरीकडे भविष्य उज्वल असेल तर जरूर जा. एवढ्या मोठ्या मनाचा नेता आम्हाला लाभला यातच आम्हाला समाधान असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *