…….. हा अविश्वास आम्हाला सत्तांतरापर्यंत घेऊन गेला – संजय शिरसाट यांनी सांगितला मुंबई ते सुरत चा प्रवास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । ‘२० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान झाले. १० जूनच्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा एक उमेदवार पराभूत झाला होता. तेव्हापासूनच पक्षाने आमच्यावर अविश्वास दाखवणे सुरू केले होते. २० जून रोजी विधान परिषदेच्या मतदानापूर्वी शिवसेनेच्या सर्व आमदारांना मंत्रालयाजवळ असलेल्या शिवालय बंगल्यात बोलावले होते. शिवालय ते प्रत्यक्ष मतदान असलेल्या खोलीपर्यंत जाण्यासाठी एका-एका आमदाराला सोडण्यात आले. प्रत्येक आमदारासोबत पक्षाने पाळत ठेवण्यासाठी अन्य एक माणूस सोबत ठेवला. यातून खुद्द एकनाथ शिंदेदेखील सुटले नाहीत. पक्षाने दाखवलेला हा अविश्वासच आम्हाला सत्तांतरापर्यंत घेऊन गेला,’ अशी कबुली आमदार संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनी शी बोलताना दिली .

शिवसेनेतील ४० व अपक्ष १० आमदारांनी बंड केले. मुंबईहून सुरत, गुवाहाटी आणि गोवा असा १२ दिवसांचा प्रवास करत हे आमदार ३ जुलै रोजी थेट विधिमंडळात अवतरले. आमदार शिरसाट यांनी या बंडामागची कहाणी सांगितली.

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची आपबीती बंडखोर आमदारांचा मुंबईतून गुंगारा देत सुरत गाठण्यापासून ते सत्तेत सहभागी होण्यापर्यंतचा प्रवास केला विशद

आम्ही मुंबईतून सुरतला गेलो, आमची पहिली बैठक तिथेच झाली. तेव्हाच आम्ही सर्व आमदारांनी ‘तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, भाजपशी तशीच बोलणी करा,’ अशी मागणी शिंदेंकडे केली होती. मात्र, त्यांनी ‘भाजपशी तसे बोलतो,’ एवढंच सांगितलं होतं. मला खात्री होती, तेे मुख्यमंत्रीच होतील. पण, अन्य आमदारांना खात्री नव्हती. शेवटी फडणवीस यांनी घोषणा करताच आमदारांच्या आनंदाला पारावार उरला नाही, असे शिरसाटम्हणाले.

आमदार शिरसाट म्हणाले, पक्ष आम्हाला डावलतोय, नेतृत्व आम्हाला वेळ देत नाही, नेतृत्वाच्या जवळ असलेल्या मंडळींना स्वपक्षातील आमदारांपेक्षा राष्ट्रवादी हा पक्ष अधिक आवडत होता. त्यामुळे शिवसेनेच्या बहुतांश आमदारांमध्ये खदखद होती. ती प्रत्यक्ष बाहेर पडण्यासाठी निमित्त ठरले ते विधान परिषद निवडणुकीचे. विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्यावर अविश्वास दाखवला, खुद्द एकनाथ शिंदेदेखील यातून सुटले नाहीत. त्यामुळे आम्ही प्रचंड अस्वस्थ होतो. मला २० जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता एकनाथ शिंदेंचा फोन आला. जिथे असाल तिथून ठाण्याच्या दिशेने निघा म्हणून सांगितले.

मी अन्य कुणालाही फोन न करता माझी गाडी घेऊन निघालो. ठाणे जवळ आल्यानंतर पुन्हा पालघरला यायला सांगितले. पालघरला जात असताना अन्य आमदारांच्या गाड्या मागेपुढे दिसू लागल्या. सर्वात पुढे एकनाथ शिंदेंची गाडी होती. त्यांच्यासोबत अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, नितीन देशमुख होते. कुठे जायचे, कधी परतायचे, याची कसलीही विचारपूस न करता आम्ही शिंदेंच्या मागे चालत राहिलो. दरम्यान, पालघर ओलांडताच ही खबर उद्धव ठाकरेंपर्यंत पोचली. त्यांनी प्रत्येक आमदाराला फोन करणे सुरू केले. मला स्वत:ला ६ फोन आले. ‘परत या, आपण बोलू,’ असे निरोप त्यांनी दिले. मी नुसता ‘हो’ म्हणायचो. पण, पुढेच जात राहिलो. हे आमदार परतण्याच्या मानसिकतेत नाहीत, हे लक्षात येताच आयजींमार्फत गुजरात आणि महाराष्ट्राच्या हद्दीवरील टोलनाक्याजवळ नाकेबंदी लावण्यात आली. टोलनाक्यापासून दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या.

पुढे नाकेबंदी सुरू आहे, याची कुजबुज पुढील वाहनचालकांमुळे आम्हाला कळली. आम्ही टोलनाका जवळ येताच गाडीतून उतरलो. बाहेर पाऊस सुरू होता. या ठिकाणी एक सर्व्हिस रोड आहे. या सर्व्हिस रोडने साधारण: ३०० मीटर पायी जात नाकेबंदी ओलांडली. आमच्या रिकाम्या गाड्याही टोलनाक्याच्या पुढे आल्या. रात्री २ वाजता आम्ही सुरतमधील हॉटेल ला-मेरिडियनला पोचलो.

आमच्यातील एकाही आमदारांनी कपडे सोबत आणले नव्हते. ही बाब एकनाथ शिंदेंना सांगितली. २१ जून रोजी सकाळीच आमच्या हॉटेलमध्ये कपडे घेऊन व्यापाऱ्यांची गाडी आली. जणू कपड्यांचे दुकानच हॉटेलमध्ये थाटले होते. त्यातून आपापल्या पसंतीचे कपडे घेतले. तसेच दाढीचे साहित्य, चपला आदी साहित्यही तेथेच मिळाले. शिंदेंना मात्र त्यांच्या पॅटर्नचे कपडे मिळाले नाहीत. त्यांचे कपडे सायंकाळी ठाण्यातील घरून सुरतला आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *