महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । जिल्हा प्रशासनाच्या अचूक नियोजन व अंमलबजावणीमुळे यंदाच्या आषाढी यात्रा काळात ७ लाख ८४ हजार भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. यामध्ये ३ लाख ७६ भाविकांनी मुखदर्शन तर ३ लाख ६४ हजार भाविकांनी पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेतला. आषाढी एकादशीदिवशी एकाच दिवसात ४४ हजार ८८० भाविकांनी पदस्पर्श दर्शन घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी यात्रा भरली नसल्याने यंदाच्या वर्षी १२ लाखाहून अधिक भाविकांदी गर्दी होती. प्रशासनाच्या अचूक नियोजनामुळे दर्शनरांगही १ ते दीड किलोमीटर होती. दर्शनासाठी यंदा १८ तासाचा वेळ लागला. शिवाय पावसामुळे वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले होते. दर्शनरांगेतील भाविकांना चहा व नाष्ट्याची सोय केली होती.
चंद्रभागा नदीपात्रात नदीत पोहत असणाऱ्या १३४ जणांचे प्राण वाचविण्यात प्रशासनाला यश आले. वीज रेस्क्यू टीम शिराळा, मानव सेवा सामाजिक विकास कार्य अकोला, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन मुळशी या चार टीमने चंद्रभागा नदीपात्रात २४ तास सेवा दिली. यामुळे १३४ जणांना वाचविण्यात यश आल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.