गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली ; पाण्याचा विसर्ग सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । नाशिक जिल्ह्यासह धरणक्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर होता. त्यामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोपरगाव शहर व बेट भागाला जोडणारा छोटा पूल, अर्थात राष्ट्रसंत जनार्दनस्वामी मौनगिरी सेतू गोदावरी पाण्याखाली गेला आहे. सदर पुलावरून वाहतूक सकाळपासूनच बंद केली. बघ्यांची गर्दी वाढल्याने, अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत गोदावरी नदीपात्रातून ८० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. सोमवारी सकाळी २८ हजार क्यूसेक पाण्याचा प्रवाह होता. तोच प्रवाह एका दिवसात कमालीचा वाढल्याने मंगळवारी दिवसभर तब्बल ८० हजार क्यूसेक वेगाने गोदावरी नदीचे पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावत होते.

गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठचा परिसर प्रशासनाने सतर्क केला आहे. गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केले आहे. दरम्यान, गोदावरीच्या पुराचा सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. पालिका प्रशासन शहरातील पाणी पातळी व पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

तालुक्यात आपत्ती व्यवस्थापनाची सर्व पथके संबंधित विभागाने सज्ज ठेवली आहेत. आमदार आशुतोष काळे यांनी आपत्ती व्यवस्थापन बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. अचानक पूरस्थिती निर्माण झाली तर काय करावे लागेल याची पूर्वतयारी करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिली. कोपरगाव शहरासह नदीकाठच्या ४० गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. स्थलांतरितांच्या निवाऱ्याची व इतर व्यवस्था अगोदरच प्रशासनाने केली आहे.

दरम्यान, मंगळवारी नाशिकच्या घाटमाथ्यावर पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने काही प्रमाणात पाण्याची आवक आज कमी झाल्याने कदाचित बुधवारी गोदावरी नदी पात्रातील पाणी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *