महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिवसेनेत दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने मातोश्री आणि शिवसेना भवन येथे शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर बैठकीसाठी आलेल्या शिवसैनिकाची तब्येत अचानक ढासळली. मातोश्रीबाहेरच या शिवसैनिकाचे निधन झाले. या शिवसैनिकाच्या कुटुंबासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले आहेत.
कसारा येथे राहणाऱ्या भगवान काळे यांचा मृत्यू मातोश्री निवासस्थानाबाहेर झाला. ६ जुलैला मातोश्रीवर बैठकीसाठी गेले असताना त्याठिकाणी काळे यांना ह्दयविकाराचा झटका आला. या घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि ठाणे जिल्हा शिवसेना सचिव साईनाथ तारे यांच्या माध्यमातून काळे कुटुंबियांना आर्थिक मदत पोहचवली. त्याचसोबत फोनवरून या कुटुंबाचं सांत्वन केले. भगवान काळे यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली.