महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी त्या एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून, या भेटीत त्या शिवसेना, भाजप खासदार आणि आमदारांची लीला हॉटेलमध्ये भेट घेणार आहेत. आजच्या बैठकीत जवळपास 250 आमदार-खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरे यांनी देखील पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, द्रौपदी मुर्मू यांच्या आजच्या मुंबई दौऱ्यात कोठेही उद्धव ठाकरे यांच्या भेटी संदर्भात आयोजन केलेले नाही. याआधी राष्ट्रपती पदाचे उमेदवार ज्या वेळेस मुंबईत आले होते. त्यावेळेस त्या उमेदवारांकडून ठाकरे कुटुंबीयांची भेट मातोश्रीवर जाऊन घेण्यात आली होती. त्यामुळे द्रोपती मुर्मू उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार का ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, आतापर्यंत शिवसेनेला भाजप अथवा एनडीएकडून या बैठकीचे आमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या बैठकीत शिवसेनेने उपस्थित राहण्याचा प्रश्नच नाही. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समुदायातून येत असल्याने शिवसेनेने त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.