एसटी बस दुर्घटना : अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आतापर्यंत 13 जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे. बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक 02572223180 आणि 02572217193 असा आहे. आज सकाळी इंदोर होऊन अमळनेर कडे निघालेली एसटी महामंडळाची बस मध्य प्रदेश मधील खलघाट आणि टिकरी यामधील नदी पुलावर नदीच्या पुलावरून नर्मदा नदीत कोसळण्याची घटना घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *