आजपासून लोणावळ्यात एकेरी वाहतूक लागू ; सतत होणाऱ्या वाहतुक कोंडीवर उपाय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । लोणवळ्यात (Lonavala) आजपासून एकेरी वाहतूक (One Way) लागू करण्यात येणार आहे. अशी माहिती लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी दिली. लोणावळा बाजार परिसरातील वाहतूक कोंडी होते. पर्यटकांमुळे (tourist) या वाहतुक कोंडीत भर पडते त्यामुळे स्थानिकांकडून एकेरी वाहतुकीची मागणी सातत्याने नागरिकाकडून केली जात होती. त्यामुळे हा बदल करण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

काही वर्षांपूर्वी लोणावळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भांगरवाडी इंद्रायणी पूल दरम्यान एकेरी वाहतुकीचा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला होता. ही एकेरी वाहतूक कोरोनाच्या काळात आणि नंतर पंडित नेहरू रोडच्या कामामुळे बंद करण्यात आली होती. या नवीन बदलानुसार भांगरवाडी बाजूने जाणारी वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुढे जातील आणि भांगरवाडी ते लोणावळा मार्केट आणि पुढे गवळीवाडा नाका परिसरात, इंद्रायणी पुलावरून पुरंदरे शाळेसमोर, संजीवनी हॉस्पिटल, रानडे हॉस्पिटलसमोरून जाणारी वाहने जातील.

लोणावळा शहर पोलीस ठाण्यासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही रस्त्यांवरील दुकानदार आणि नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर उभी करू नयेत. लोणावळा शहर पोलिसांनी प्रवासी वाहनांसाठी रस्ते मोकळे ठेवण्याचं आवाहन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि इंद्रायणी पुलावर पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. तसंच एकेरी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी व कर्मचारी असतील. लोणावळा नगरपरिषदेचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

नागरिकांनीही या बदलानुसार वाहन चालवून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं. सर्वांच्या सोयीसाठी आणि सर्वांच्या मागणीनुसार हा बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणतीही विनाकारण कारणे न देता अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रवास करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. नागरिकांनी पोलिस कर्मचारी यांच्याशी भांडण करू नका, असा सल्लाही दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली जाईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *