शिवसेनेच्या बड्या नेत्याचे विधान ; “खासदार फुटणार याची कल्पना उद्धव ठाकरेंना होती ”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. आतापर्यंत अनेक आमदार तसेच स्थानिक नेते शिंदे गटात सामील झाले आहेत. असे असताना आमदारांनंतर आता १२ खासदारदेखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी (१९ जुलै) दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिंदे यांच्या या दौऱ्यादरम्यान शिवसेनेच्या खासदारांमध्ये फूट पडू शकते, असे म्हटले जात आहे. असे असताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही बंडखोरी होणार याची कल्पना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना होती, असे राऊत म्हणाले आहेत. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

“मला यावर (खासदार बंडखोरी) फार गांभीर्याने प्रतिक्रिया द्यायची नाही. हे होणार होतं याची कल्पना उद्धव ठाकरे यांना होती. प्रत्येक खासदारावर दबाव टाकण्यात आला. वेगवेगळ्या पद्धतीची आमिषं दाखवण्यात आली. वेगवेगळ्या केसेस दाखल करण्याच्या धमक्या द्यायच्या आणि आपल्याकडे खेचून घ्यायचं, अशा प्रकारची कपटनीती या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या खासदारांसोबत खेळली जात होती. दुर्दैवाने त्याला ते बळी पडले आहेत,” असे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले.

शिंदे गटाने शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर केल्याचे म्हटले जात आहे. यावरदेखील राऊत यांनी मत व्यक्त केले. “शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला बरखास्त करण्याचा अधिकार या गद्दारांना नाही. त्यांनी शिवसेनेची कार्यकारिणी बघावी, तपासावी आणि मगच याबाबतचा निर्णय घ्यावा. २० जुलै रोजीच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे आमचे लक्ष आहे,” असे राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *