Ramdas Kadam: अशी किती जणांची हकालपट्टी करणार ? “मी बोललो तर भूकंप होईल, पण…”; रामदास कदमांचा थेट उद्धव ठाकरेंना इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करायला हवं. माझी हकालपट्टी करण्यात आलेली नाही. त्याआधीच मी राजीनामा दिला आहे आणि उद्धव ठाकरे अशी किती जणांची हकालपट्टी करणार आहेत?, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला. तसंच आज बाळासाहेब आज असते तर आज जे घडलं आहे ते घडलंच नसतं. शरद पवारांना बाळासाहेब हयात असताना जे जमलं नाही, ते त्यांनी उद्धव ठाकरेंकरवी करुन घेतलं. शरद पवारांनी शिवसेना फोडली, असा घणाघात रामदास कदम यांनी केला.

“ज्या दिवशी ही महाविकास आघाडी बनत होती. त्याचवेळी मी विरोध केला होता. पण माझं ऐकलं गेलं नाही. शिवसेनेसाठी आयुष्याची ५२ वर्ष खर्च केली. त्याच रामदास कदमला मातोश्रीवर बोलावून माध्यमांमध्ये बोलायचं नाही असा आदेश मला उद्धव ठाकरेंनी दिला. तो मी मानला. गेल्या तीन वर्षांपासून मी तोंड बंद ठेवून बुक्क्यांचा मार सहन करत आहे. तरीही आज तुम्ही माझी हकालपट्टी करायला निघालात. याबद्दल मला खूप आजही वेदना होतात. माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. पण मी बोलत नाहीय. कारण मी बोललो तर भूकंप होईल. बाळासाहेबांमुळे मी अजूनही शांत आहे”, असं रामदास कदम म्हणाले.

रामदास कदम यांनी यावेळी अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. “बाळासाहेब साधे होते असं उद्धव ठाकरे म्हणतात. पण तसं नाहीय. बाळासाहेब साधे नव्हते. तुम्ही साधे आहात आणि याचाच फायदा घेऊन शरद पवारांनी तुम्हाला फसवलं. शिवसेना युतीत २५ वर्ष सडली असं तुम्ही म्हणालात आणि आज अडीच वर्षात अख्ख्या शिवसेनेत उभी फूट पडली. उद्धव ठाकरेंनी आजूबाजूच्या लोकांचं ऐकणं थांबवावं. उद्या शिवसेना भवनावर बाळासाहेबांच्या बाजूला अनिल परबचाही फोटो पाहायला मिळेल”, असं रामदास कदम म्हणाले.

शिवसेनेसाठी दिलेलं योगदान आणि आज द्यावा लागलेला राजीनामा याबाबत बोलताना रामदास कदम प्रचंड भावूक झालेले पाहायला मिळाले. “आमचं काय चुकलं? पक्षासाठी अनेक केसेस अंगावर घेतल्या. ज्या व्यक्तीनं पक्षासाठी ५२ वर्ष खर्च केली. त्याला आज राजीनामा देण्याची वेळ येते. गेले १८-२० दिवस मी झोपलेलो नाही. इतक्या प्रचंड वेदना मला होत आहेत. माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला. गेल्या सहा महिन्यांपासून उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी तो वेळ मागतोय. पण भेट दिली गेली नाही आणि आज उद्धव ठाकरे ठिकठिकाणी सभा घेत फिरत आहेत. अशी वेळ का आली. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करुन आजही दोन पावलं मागे यावं आणि पक्षाला सावरावं”, असं रामदास कदम म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *