महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने गरिबांसाठी मोफत रेशनची व्यवस्था सुरू केली होती. सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ अपात्र लोकही घेत असल्याची माहिती सरकारला मिळाली आहे, असा दावा अलीकडेच व्हायरल होत असलेल्या बातम्यांमध्ये करण्यात आला होता. सरकार अपात्र लोकांना रेशनकार्ड सरेंडर करण्याचे आवाहन करत आहे, असंही त्यात सांगण्यात येत आहे. जे रेशनकार्ड सरेंडर करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा दावाही या बातमीत करण्यात आला होता. ही बातमी कळल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आणि सरकारने असा कोणताही आदेश जारी केला नसल्याचे सांगितले.
तुमच्याकडे रेशन कार्ड संबंधित नियमांची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड बनवले असेल आणि सरकारच्या रेशन योजनेचा फायदा घेत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. एवढेच नाही तर तपासात तक्रार खरी असल्याचे आढळून आल्यास तुमच्यावर कारवाईही होऊ शकते. जाणून घेऊया काय आहेत नियम?
जर एखाद्या कार्डधारकाकडे स्वतःच्या उत्पन्नातून मिळालेला 100 चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट किंवा घर, चारचाकी वाहन /ट्रॅक्टर, शस्त्र परवाना, गावात दोन लाखांपेक्षा जास्त आणि शहरात तीन लाखांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न असेल. तर अशी लोकं स्वस्त रेशन योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.