![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा असलेल्या मुंबई-पुणे या मार्गावरील एसटीप्रवास हा पर्यावरणपूरक आणि ध्वनिप्रदूषणमुक्त होणार आहे. एसटी महामंडळात १०० विद्युत बस सप्टेंबरअखेर दाखल होणार आहेत. खासगी अश्वमेध आणि शिवनेरीचे कंत्राट संपल्याने या गाड्या एसटी ताफ्यातून बाहेर पडणार असून या गाड्यांच्या जागी विद्युत बस धावणार आहेत.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकी आणि खासगी मालकीच्या वातानुकूलित गाड्या आहेत. अश्वमेध आणि शिवनेरी या खासगी गाड्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी महामंडळात दाखल करण्यात आलेल्या होत्या. हा करार कालावधी संपुष्टात आल्याने नव्याने नूतनीकरण करण्यात येणार नाही. महामंडळाचा आर्थिक तोटा कमी करण्यासह इंधन दरावरील खर्च कमी करण्यासाठी विजेवर धावणाऱ्या गाड्याचा समावेश प्रवासी वाहतुकीत करण्यात येणार आहे, असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
एसटी महामंडळासाठी १०० वातानुकूलित विद्युत बस बांधणीचा आदेश प्राप्त झाला आहे. ‘पुरीबस’ या नावाने धावणाऱ्या आंतरशहरीय बसच्या धर्तीवर या बसची बांधणी असेल. या बस बांधणीचे काम सध्या सुरू आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ३० ते ३५ गाड्यांचा ताफा महामंडळात दाखल होईल. सप्टेंबरअखेर टप्याटप्याने या गाड्या महामंडळाकडे सुपूर्द करण्यात येतील. या गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन मुंबई सेंट्रल येथे उभारण्यात येणार असून, हे उभारण्याचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती एमइआयएल समूह कंपनीच्या इवेट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रवक्त्याने दिली.
कंत्राटाचे नूतनीकरण केलेले नसल्याने व्यावसायिकाने एकूण २८ अश्वमेध आणि शिवनेरी विक्रीसाठी काढल्या आहेत. अश्वमेध बसची किंमत २८ लाख आणि शिवनेरीबसची किंमत २० लाख ठेवण्यात आलेली आहेत. एसटीच्या गाड्या विक्रीस आहेत, असा मेसेज बुधवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाला. या गाड्या खासगी असल्याचे स्पष्टीकरण महामंडळाकडून देण्यात आले आहे.