महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती काही केल्या थांबायचे नाव घेताना दिसत नाही. अवघ्या काही तासांपूर्वी एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणारे नेते पुढच्याच क्षणाला दुसऱ्या गटात सामील होताना दिसत आहेत. हाच प्रकार आदित्य ठाकरे यांच्याबाबत घडला आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी गुरुवारपासून राज्यव्यापी शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे भिवंडीत पोहोचले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भिवंडीत आक्रमक भाषण करत एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे स्थानिका शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारेल, नवी उमेद जागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या भाषणाला काही तास उलटत नाही तोच भिवंडीतील शिवसैनिक गुरुवारी रात्रीच एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महानगरपालिका तसेच ठाणे ग्रामीण विभागातील शिवसेना नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला जाहीर पाठींबा दर्शविला.#realshivsena pic.twitter.com/kIjMETN4yO
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 21, 2022
एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री फोटो ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली होती. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महानगरपालिका तसेच ठाणे ग्रामीण विभागातील शिवसेना नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला जाहीर पाठींबा दर्शविला, असे एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांची ‘निष्ठा यात्रा’ आणि ‘शिवसंवाद यात्रे’ने ही पडझड खरंच रोखली जाणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.