आर्थिक निर्णय घेताना घ्या काळजी ; मंदी फक्त काही दिवसांवर ; पाहा तज्ज्ञांनी काय म्हटलंय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । करोना व्हायरसच्या धक्क्यानंतर आता संपूर्ण जगावर गेल्या काही दशकातील सर्वात मोठ्या मंदीची टांगती तलवार आहे. यामुळेच शेअर बाजारात देखील घसरणीचे चित्र आहे. विशेषत: टेक कंपन्यांचे शेअर्स गेल्या ५-६ महिन्यात फार घसरले आहेत. अनेक तज्ज्ञांनी मंदी फक्त काही दिवसांवर असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी मंदी आली आहे फक्त त्याची औपचारिक घोषणा झालेली नाही असे म्हटलय.

या दरम्यान गुगल अमेझॉन, अ‍ॅपल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स आणि टेस्लासह जगातील सर्व दिग्गज कंपन्यांनी मंदीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. या कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. तर काहींनी नवी भरती थांबवली आहे.

अल्फाबेट/ गुगल: गुगलची मुख्य कंपनी असलेल्या अल्फाबेटने नवी नोकर भरती कमी केली आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी इंटरनल मेमोमध्ये सांगितले होते की, गुगलने भलेही १० हजार जणांना नोकरी दिली असली तरी या वर्षी नव्या संधी कमी केल्या जातील. अन्य कंपन्यांप्रमाणे मंदीचा परिणाम गुगलवर देखील होईल. गुगलकडे आता १ लाख ६४ हजार कर्मचारी आहेत.

अमेझॉन- जगातील सर्वाधिक रोजगार देणाऱ्या कंपन्यांमध्ये अमेझॉनचा समावेश होतो. मार्च २०२२ पर्यंत अमेझॉन सोबत १६ लाख कर्मचारी होते. एप्रिल महिन्यात कंपनीने म्हटले होते की, त्यांच्याकडे गरजेपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. करोनामुळे सुट्टीवर गेलेले कर्मचारी पुन्हा कामावर परतले आहेत. यामुळे आम्ही अचानक अंडरस्टाफवरून ओव्हर स्टाफ झालो आहोत. यामुळे कामावर परिणाम होत आहे. कंपनीने त्याची काही गोदामे भाड्याने देण्याचा विचार केला आहे.

अ‍ॅपल- मंदीवर अ‍ॅपलने अद्याप अधिकृतपणे काही सांगितले नाही. पण ब्लमबर्गच्या एका रिपोर्टनुसार मंदीचा सामना करण्यासाठी नव्याने भरती कमी केली जात आहे. काही विभागातील खर्च कमी करण्यावर विचार सुरू आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार कंपनीकडे १.५४ लाख कर्मचारी काम करत होते.

फेसबुक- फेसबुकची मुख्य कंपनी असलेल्या मेटाने इंजिनिअरिंग भरती ३० टक्क्यांनी कमी केली आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की, इतिहासातील सर्वात वाईट आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. या वर्षाच्या मार्चपर्यंत कंपनीकडे ७८ हजार कर्मचारी होते.

मायक्रोसॉफ्ट- कंपनीने मे महिन्यात कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, विंडोज, ऑफिस आणि टीम ग्रुप्समध्ये नवी भरती कमी केली जाणार आहे. ज्यामुळे आर्थिक मंदी आली तर त्याला सामोरे जाता येईल. कंपनीने काही दिवसांपूर्वी कर्मचारी कपात देखील केली आहे. २०२१च्या अखेरपर्यंत कंपनीकडे १.८१ लाख कर्मचारी होते.

नेटफ्लिक्स- व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममधील नेटफ्लिक्सने कर्मचारी कपात सुरू केली आहे. कंपनीने मे महिन्यात १५० जणांना घरी पाठवले. त्यानंतर जूनमध्ये ३०० जणांना कामावरून कमी केले. कंपनीला अनेक कारणामुळे सबक्राइबर्समध्ये तोटा सहन करावा लागतोय. पहिल्या तिमाहिती यात २ लाखांनी घट झाली होती. तर जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत ९.७० लाखांनी घट झाली होती. गेल्या वर्षापर्यंत कंपनीकडे ११ हजार ३०० कर्मचारी होते.

टेस्ला- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांच्या मालकीची टेस्लाने जून महिन्यात कॅलिफोर्निया येथील एक फॅसिलिटी बंद केली होती. यामुळे २०० कर्मचाऱ्यांनी घरी बसण्याची वेळ आली. मस्क यांनी स्वत: मंदीची शक्यता वर्तवली आहे. मंदीला तोंड देण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेणे गरजेचे आहे. पुढील ३ महिन्यात १० टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते. २०२१च्या अखेरपर्यंत टेस्लाकडे १ लाख कर्मचारी होते.

अन्य- टेक कंपन्यांमध्ये twitterने मे महिन्यांपासून नोकर भरती थांबवली आहे. ऑनलाइन फर्निचर रिटेल वेफयर इंकने देखील असाच निर्णय घेतलाय. युनिटी सॉफ्टवेअर कंपनीने ४ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलय. स्पॉटिफायने २५ टक्के तर Niantic Incने जून महिन्यात ८ टक्के कर्मचारी कमी केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *