महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देऊ नका, असे त्यांनी मला फोन करुन सांगितले. त्यामागे त्यांचा काय हेतू होता, हे मला आजही समजलेलं नाही. मात्र, आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक माझ्या दालनात घेतली आणि सुरक्षा देण्याबाबत तसा ड्राफ्ट तयार केला, अशी माहिती बंडखोर आमदार आणि माजी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली.
बंडखोर आमदार कांदे यांच्या आरोपावर तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचं काय म्हणणं आहे, यासंदर्भात ‘झी 24 तास’ने प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हा गंभीर आरोप केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशामुळेच एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.
एका मराठी माणसाला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिली गेली, तरीदेखील त्यांची सुरक्षा व्यवस्था का नाकारण्यात आली? मात्र, जे हिंदुत्वाविरोधात होते, त्यांना सुरक्षा व्यवस्था का दिली, असा सवालही त्यांनी केला. दरम्यान माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सुहास कांदे यांच्या आरोपांचं खंडन केले आहे.
शंभूराजे देसाई असू किंवा मी असू हे निर्णय घेत नाही. एसआयडीचा रिपोर्ट आल्यानंतर तशी सुरक्षा दिली जाते. मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री कोणताही हस्तक्षेप करत नाही. मुख्य सचिवांच्या अंतर्गत ही समिती असते. रिपोर्ट पाहिला जातो आणि मग त्याबाबत निर्णय घेतला जातो. उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी कोणतीही सूचना आली असेल यात तथ्य वाटत नाही, असे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले.
उलट एकनाथ शिंदे त्यावेळी गडचिरोलीचे पालकमंत्री होते त्यांना जास्त सुरक्षा होती. थोडा संयम बाळगला पाहिजे, अनेक झालेले निर्णय पुन्हा बदलू शकतील. जे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले यांना उमेदवारी कशी दिली जाणार याबाबत स्पष्टता नाही. शिवसेना पक्षाचा हा विषय असल्याने काही लोकं परत देखील जाऊ शकतात. यापुढे तिन्ही पक्ष एकत्र लढणार की वेगवेगळे लढणार याचा निर्णय वरिष्ठ घेतील, असे ते म्हणाले.