महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । शिंदे गटातील वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्या नात्यातील ओलावा अजूनही तितकाच असल्याचं सांगत आम्ही सर्व आमदारांनी बंड केलं त्यावेळी आपल्या भूमिकेसोबत उद्धव ठाकरे यांनीही यायला हवं, असं म्हणत एकनाथ शिंदे अक्षरश: रडल्याचं सांगितलं.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी आजही एकत्र येऊन पूर्वीसारखी शिवसेना पुढे जावी, असं मला वाटतं. हीच तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे. ज्यावेळी आम्ही बंड करुन महाराष्ट्राबाहेर पडलो, सूरत-गुवाहाटीला गेलो, त्यावेळी एकनाथ शिंदे तिकडे घेतलेल्या बैठकांमध्ये रडायचे, त्यांच्या डोळ्यात पाणी असायचे, उद्धव ठाकरे आपल्या सोबत असायला हवेत, आपण घेतलेल्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा द्यायला हवा, असं म्हणत ते भावनिक व्हायचे, असं रमेश बोरनारे म्हणाले.
शिवसेना नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे ठाकरे सरकारमध्ये उद्योग खाते होते तसेच त्यांच्याकडे औरंगाबादच्या पालकमंत्रीपदाची देखील जबाबदारी होती. त्यावेळी मी मराठवाडा वॉटर ग्रीडच्या अनुषंगाने काही कामे घेऊन गेलो असता, माझी फाईल देसाई यांनी फेकून दिली आणि त्यांनी मला हॉटेलबाहेर काढलं, असा आरोप बोरनारे यांनी सुभाष देसाई यांच्यावर केलाय.