“कमीत कमी अपेक्षा ठेवा”; मंत्रिपदासाठी इच्छुकांना फडणवीसांचा सल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन महिना होत आला तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मंत्रिमंडळाच्या विस्ताराला लागणाऱ्या विलंबावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. पुढच्या आठवड्यात हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदासाठी इच्छुकांना मोलाचा सल्ला दिला आहे. “कमीत कमी अपेक्षा ठेवा”, असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे. पनवेलमध्ये भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळेस ते बोलत होते.

मंत्रिपदासाठी अत्तापर्यंत अनेक नेत्यांनी मला अर्ज दिला आहे. जवळजवळ १२०० अर्ज माझ्याकडे आले आहेत. मात्र, सर्व नियमांच पालन करुनच मंत्रिमंडळ विस्तारात आमदारांना संधी दिली जाईल. यासाठी राज्यपालांचेही मार्गदर्शन घेण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले. हे केवळ भाजपाचे सरकार नाही तर शिवसेना- भाजपाचे युती सरकार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात काही जागा शिवसेनेला द्याव्या लागतील. अनेकजण अनुभवी आहेत पण सगळ्यांनाच संधी मिळू शकणार नाही. त्यामुळे कमीत कमी अपेक्षा ठेवा, असा सल्ला फडणवीसांनी भाजपा नेत्यांना दिला आहे.

फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला
भाजपाचे सरकार निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. या अडीच वर्षात काही प्रमाणात तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. मात्र, आपल्याला शिवसेनेलाही सोबत घेऊन पुढे जायचं आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील, अशी इच्छा बाळगण्यापेक्षा आगामी निवडणुकीत बहुमताचं सरकार कसं आणता येईल याचा विचार करण्याची विनंती फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *