महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । कोणाचे आमदार कोणाच्या संपर्कात आहेत, हे सांगण्याची गरज नाही. एकमेकांचे उणेदुणे काढण्यापेक्षा पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्या, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेना नेते खा. संजय राऊत यांना टोला लगावला. गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अजित पवार आज पूरस्थितीची पाहणी करण्याकरिता गडचिरोलीत आले होते. सुरुवातीला त्यांनी शिवणी गावात जाऊन पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
शिंदे गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. यासंदर्भात प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, कोणाचे आमदार कोणाच्या संपर्कात आहेत, हे सांगण्याची गरज नाही. एकमेकांचे उणेदुणे काढण्यापेक्षा पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेणे आवश्यक आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही अजित पवार यांनी शरसंधान साधले. पूरस्थितीची पाहणी करण्याकरिता अजित पवारांनी एवढा उशिरा का लावला, अशी टीका बावनकुळे यांनी केली होती. त्यावर पवार म्हणाले, आम्ही देखावा करीत नाही. प्रत्यक्ष मदत करतो. बावनकुळेंनी मीडियापुढे बडबड करण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असा उलट टोला पवार यांनी लगावला.