महाराष्ट्र २४- ऑनलाईन -। बीड । विशेष प्रतिनिधी । आकाश शेळके । जागतिक महामारी करोनाने जगात थैमान घातले असून, त्याचा परिणाम आपल्या देशात त्याचबरोबर आपल्या राज्यात झाला आहे. या महामारीला रोखण्यासाठी देश तीन मेपर्यंत लॉकडाउन करण्यात आला आहे. लॉकडाउनच्या कालावधीत शासनाने सर्व वस्तीगृहे आरोग्य खात्याने ताब्यात घेतली आहेत. विद्यापीठ स्तरावरुन कुठलाही ठोस असा निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढत असून, ‘आमच्या शिक्षणाचे काय होणार’? असा प्रश्न विद्यार्थी आणि संबंधीत संघटनेकडून उपस्थिती होत आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबद्दल आणि परीक्षेसंदर्भात राज्य सरकराने ठोस निर्णय घ्यावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री, सर्व कुलगुरू यांनी पदवी व पद्यव्युत्तरच्या विद्यार्थ्यांची नेमकी परीक्षा कधी होणार? याबाबत दिलासा देणारी माहिती द्यावी. तसेच विद्यार्थ्यांच्या भावनांचा सकारात्मक विचार करावा अशी विनंती पालकां कडून करण्यात येत आहे.
परीक्षेची चिंता अधिकच तीव्र – परीक्षा संदर्भात योग्य निर्णय घेण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. त्या समितीने निश्चित केलेला परीक्षेचा पॅटर्न मंजुरीसाठी आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयास सादर करण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळत असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमावस्था आहे. यामुळे परीक्षेबाबतची चिंता अधिकच तीव्र होताना दिसत आहे. विविध माध्यमातून परीक्षा ऑनलाइन होणार तर, दिल्ली विद्यापीठ विद्यार्थ्यांना प्रमोट करणार अशा उलटसुलट बातम्या येत आहेत.
परीक्षा नेमक्या कधी होणार- विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात दररोज विविध माध्यमातुन उठणाऱ्या अफावांमुळे पालक आणि विद्यार्थी गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. त्यांचा मानसिक ताण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत तातडीने निर्णय होणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रीया पालकवर्गातुन उमटत आहेत. ऑनलाइन परीक्षेसाठी आवश्यक ती साधने सर्व विद्यार्थ्यांना कशी उपलब्ध होतील? परीक्षा नेमक्या कधी होणार? विद्यार्थी कुठे राहणार? अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत असून, तातडीने याविषयी मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.