प्रथम सावित्रीबाई फुले , नंतर छत्रपती शिवाजी महाराज व आता मुंबईच्या आर्थिक कुवतीवर सवाल ; कोश्यारींचा वादांशी जुना संबंध

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईविषयी आक्षेपार्ह विधान केले. मुंबईतून गुजराती व राजस्थानी निघून गेले, तर मुंबईची आर्थिक सुबत्ताच निघून जाईल, असे ते म्हणाले. या विधानाद्वारे त्यांनी एकप्रकारे मराठी माणसांनाच कमी लेखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मराठीमन पेटून उठले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आदी विरोधी पक्ष विशेषतः सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटानेही त्यांच्या या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला.

महाराष्ट्र व मुंबईच्या विकासात मराठी माणसांचे सर्वाधिक योगदान असल्याचे हे पक्ष म्हणाले. त्यानंतर त्यांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे नमूद करत त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणसांचे मोठे योगदान असल्याचे स्पष्ट केले. यामुळे या वादावर पडदा पडला.

पण राज्यपाल कोश्यारींनी यावेळी प्रथमच असे वादग्रस्त विधान केले नाही. त्यांनी यापूर्वीही अनेकदा अशी विधाने करुन स्वतःचे अंग पोळवून घेतले आहे. चला तर मग पाहुया कोश्यारींनी आतापर्यंत केलेली वादग्रस्त विधाने व त्यांचे निर्णय…

छत्रपती शिवाजी महाराज

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गत 27 फेब्रुवारी रोजी औरंगाबादेतील एका कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केले. ते म्हणाले -‘चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थ रामदासांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्ताला छोटे लेखणार नाही. पण गुरुच स्थान समाजात नेहमीच मोठे असते. शिवाजी समर्थांना म्हणाले की, हे राज्य मला तुमच्या कृपेनेच मिळाले. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून शिवाजी महाराजांनी समर्थांना या राज्याची सत्तेची चावी देण्याची तयारी दर्शवली. त्यावर समर्थांनी ही राज्याची चावी मला कुठे देता, तुम्हीच याचे ट्रस्टी अर्थात विश्वस्त आहात.’

त्यांच्या या विधानाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटले. अनेक राजकीय संघटनांनी त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर कोश्यारींनी आपली बाजू स्पष्ट करुन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज देशाचे प्रेरणास्त्रोत आहेत. मला त्यांच्याबद्दल जेवढी माहिती होती, त्यावरून मला समर्थ रामदास त्यांचे गुरू असल्याचे वाटले. त्यामुळे मी हा संदर्भ दिला. पण याविषयी काही जणांनी मला काही वस्तुस्थिती सांगितली. त्याची विस्तृत माहिती मी घेणार आहे,’ असे ते म्हणाले.

ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले

कोश्यारींनी 2 मार्च रोजी देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. ते म्हणाले -‘कल्पना करा की सावित्रीबाईंचे लग्न दहाव्या वर्षी झाले. त्यावेळी ज्योतिबा फुले 13 वर्षांचे होते. या वयात मुले-मुली काय करत असतील, लग्न झाल्यानंतर काय करत असतील याचा विचार करा.’ त्यांच्या या विधानाचेही तीव्र पडसाद उमटले.

शिंदेंना भरवला पेढा

गत 29 जून रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला., त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन करण्याचा दावा सादर केला. त्यावेळी राज्यपालांनी शिंदे व फडणवीसांचे पेढ्याने तोंड गोड केले. राज्यपालांनी एखाद्या पक्षाचे तोंड गोड करण्याचा हा देशातील पहिलाच प्रसंग होता. त्यामुळे त्यांच्या या कृतीचेही तीव्र पडसाद उमटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *