Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धा ; या दिवशी भारतीय संघ जाहीर होणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा येत्या सोमवारी होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेच्या यजमानपदाखाली संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. आशियाई क्रिकेट महासंघाने नुकतेच या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान व एक पात्रता फेरीतून येणारा संघ अशा सहा टीम्समध्ये जेतेपदाची लढत रंगणार आहे. विराट कोहली, लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंचे या स्पर्धेतून भारतीय संघात पुनरागमन अपेक्षित आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्या सामन्याने २७ ऑगस्टला स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर २८ ऑगस्टला भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) हा हायव्होल्टेज सामना खेळवला जाईल. ४ सप्टेंबरला पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान लढत अपेक्षित आहे. अ गटात या दोन्ही संघांना स्थान दिलं गेल्यामुळे दोन अव्वल संघ ४ सप्टेंबरला भिडणार आहेत. पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेसाठी कालच संघ जाहीर केला. ८ ऑगस्टपूर्वी या स्पर्धेकरीत संघ जाहीर करायचे आहेत आणि BCCI सोमवारी याबाबतची मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातली ट्वेंटी-२० मालिका ७ ऑगस्टला संपणार आहे आणि त्यानंतर बीसीसीआय आशिया चषक स्पर्धेसाठीचा संघ जाहीर करेल. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिटींगमध्ये सहभागी होणार आहेत. पंजाब किंग्सचा गोलंदाज अर्शदीप सिंग याचा आशिया चषक स्पर्धेसाठीच्या संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्ध त्याने ट्वेंटी-२० संघात पदार्पण केले होते आणि सध्या सुरू असलेल्या विंडीजविरुद्धच्या मालिकेतही तो तीनही सामने खेळला आहे.

लोकेश राहुल याचे पुनरागमन हाही चर्चेचा विषय आहे. दुखापतीमुळे लोकेश सातत्याने मालिकांना मुकतोय. फिटनेस टेस्ट पास केल्यास त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर ही आहे. आशिया चषक स्पर्धेत खेळणाराच संघ वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता जास्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *