काळजी घ्या ; कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय ; मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत धोकादायक वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । गेल्या 24 तासांत देशात 19 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेत. तर दिवसभरात 49 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यातली कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढीला लागल्याचं दिसतंय. मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या 3 दिवसांपासून वाढ होतेय.

त्यानंतर आता केंद्रानं महाराष्ट्रासह दिल्ली, केरळ, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यांमध्ये अलर्ट जारी केला असून मार्गदर्शक सूचना केल्यात.

चाचण्या, ट्रेसिंग-ट्रॅकिंग, उपचार, लसीकरण आणि करोना प्रतिबंधक नियमावलीचं कठोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेत. बाजार, शाळा, महाविद्यालयं, रेल्वे स्थानकं, देवस्थानं इथं मास्क वापरण्याचा सल्ला दिलाय. लसीकरणाचा वेग वाढवण्याची सूचना करण्यात आली असून ३० सप्टेंबपर्यंत मोफत बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या जिल्ह्यांवर बारकाईनं लक्ष ठेवा आणि आरटीपीसीआर आणि अँटीजेन टेस्टला प्राधान्य द्या, अशी सूचना करण्यात आलीये. इन्फ्लूएन्झासदृश संसर्ग, फुफ्फुसांचा अतिगंभीर संसर्ग या आजारांवर लक्ष ठेवा. परदेशी प्रवाशांच्या नमुन्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग करा आणि अधिक रुग्ण आढळणाऱ्या भागातील नमुने प्रयोगशाळांकडे पाठण्याची सूचनाही या राज्यांना करण्यात आलीये.

पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध नको असतील, तर तुम्हीही स्वतःची काळजी घ्या. गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचे नियम पाळा, सॅनिटायझरचा वापर करा. अन्यथा पुन्हा एकदा दोन वर्षांपूर्वीसारखी स्थिती यायला वेळ लागणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *